ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याने ब्रेग्झिटचे समर्थक व लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन, अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्न, गृहमंत्री थेरेसा मे यांची नावे शर्यतीत आहेत.

बोरिस जॉन्सन – बोरिस जॉन्सन सत्ताधारी काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे विद्यमान खासदार असून लंडनचे माजी मेयर आहेत. पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि इतिहासतज्ज्ञ असलेले जॉन्सन ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे या मताचे पुरस्कर्ते आहेत. ते २०१५ साली उसब्रिज आणि साऊथ रिस्लिप मतदारसंघातून निवडून आले.

जॉर्ज ओसबोर्न –

जॉर्ज ओसबोर्न सत्ताधारी काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे विद्यमान खासदार आणि ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. ते २००१ पासून टॅटन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते द डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रासाठी काम करत होते. कृषी, मत्स्योद्योग आणि अन्नमंत्री डग्लस हॉग यांचे ते सल्लागार होते.

थेरेसा मे –

थेरेसा मे सत्ताधारी काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाच्या विद्यमान खासदार आणि २०१० पासून ब्रिटनच्या गृहमंत्री आहेत. त्या सर्वप्रथम १९९७ साली मेडनहेड येथून पार्लमेंटवर निवडून गेल्या. त्या काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाच्या अध्यक्षही होत्या. याशिवाय अन्य अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. २०१२ पर्यंत त्यांच्याकडे महिला खात्याचाही कार्यभार होता.

 

ब्रेग्झिट, रेग्झिट, नेग्झिट..

ट्विटरच्या ट्रेंडसवर ब्रेग्झिटचा विषय चांगलाच लोकप्रिय ठरला, त्यात ब्रिटनच्या युरोपमधून बाहेर पडण्याला हॅशटॅग ब्रेग्झिट, रिझर्व बँकेतून बाहेर पडण्याच्या गव्हर्नर रघुराम राजन यांच्या निर्णयाला हॅशटॅग रेग्झिट तर भारतीय वंशाचे अधिकारी निकेश अरोरा यांनी सॉफ्टबँकचे अध्यक्षपद सोडण्याला हॅशटॅग नेग्झिट संबोधले गेले. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यास देशाला काय संबोधावे याची गमतीदार नावेही त्यातून लोकांनी तयार केली त्यात बेल्जियमला बायजियम, पोर्तुगालला डिपोर्टुगाल, तर नेदरलँडसला नेदरमाइंड. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही संधी साधताना दिल्लीला राज्याचा दर्जा देण्यासाठी ब्रेग्झिटसारखेच जनमत घेतले पाहिजे असे सांगितले.

 

नव्या पंतप्रधानांनीच काय ते पाहावे..

लंडन : जनतेने दिलेला धक्कादायक कौल मान्य असल्याचे सांगत पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सूतोवाच केले. त्याचवेळी ब्रिटन आता एक नवे वळण घेत असून अशा परिस्थितीत देशाची नौका नेमक्या कोणत्या दिशेने वळवायची याचा निर्णय नव्या पंतप्रधानांनाच घेऊ द्यावा, असे कॅमेरून यांनी स्पष्ट केले.

युरोपीय संघाशी आता नव्याने बोलणी करण्यासाठी आपण तयारी करायला हवी. त्यामुळे देशाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असलो तरी यापुढेही देशाच्या सेवेसाठी मी तत्पर असेन. मला जेवढे शक्य होईल तेवढे सर्व काही मी इंग्लंडसाठी करेन, असे भावनाविवश झालेले कॅमेरून म्हणाले. पंतप्रधानांच्या १०, डाऊनिंग स्ट्रीट, या निवासस्थानी कॅमेरून यांनी जनतेला संबोधित करणारे भाषण केले. यावेळी त्यांची पत्नी सामंता उपस्थित होत्या.