बेल्जियममधील ब्रसेल्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यानिमित्त स्तब्धता पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्यांनी युरोप डळमळीत झालेला नाही हे दाखवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राजे फिलीप व राणी मॅथिलदी यांच्यासह पंतप्रधान चार्ल्स मायकेल व इतर मंत्र्यांनी सकाळी ७.५८ वाजता नूतनीकरण करण्यात आलेल्या झावेतेम विमानतळावर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रांग लावली होती. दोन आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात या ठिकाणी सोळा जण ठार झाले होते. विमानतळावरील कर्मचारी फॅबिनी व्हॅन स्टीनकिस्टे यांचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांचा भाऊ एडी व्हॅन काल्सटर याने रॉक बॅलड सादर करीत श्रद्धांजली वाहिली. विमानतळावर २२ मार्च २०१६ रोजी झालेल्या हल्ल्यातील मृतांची नावे लावण्यात आली आहेत. मृतांच्या शेकडो नातेवाइकांनी तेथे भेट दिली. विमानतळ अधिकाऱ्यांनी मृतांची नावे वाचून दाखवली व हे लोक आमच्या मनातून कधीच दुरावणार नाहीत, असे सांगितले.

मालबीर सबवे स्टेशन येथे तिसऱ्या हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेत १६ जण ठार झाले होते, तेथे राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती श्रद्धांजली वाहणार आहेत. दोन हल्ल्यांत ३२० जण जखमी झाले होते. तेथे काही काळ रेल्वे, ट्राम व बसगाडय़ा थांबवल्या जाणार आहेत.

ब्रसेल्स येथे युरोपीय समुदायाच्या संस्थांमध्ये एका स्मारकाचे अनावरण राजे व राणी करणार आहेत. बेल्जियममधील या हल्ल्यानंतर आजही तेथे रस्त्यावर गस्त सुरूच आहे, कारण आयसिसच्या हल्ल्यांचा धोका टळलेला नाही. इराक व सीरियातून आयसिसचे दहशतवादी मायदेशी आले आहेत.

पॅरिसमध्ये नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते. त्यानंतर ब्रसेल्स येथे हल्ले झाले होते. बुधवारच्या कार्यक्रमात राजघराण्यापासून शाळकरी मुलांपर्यंत सर्वानी बेल्जियम समाजाची एकजूट दाखवून दिली.