ब्रुसेल्स विमानतळ मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. विमानतळातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या हॉलमध्ये (डिपार्चर) हे दोन स्फोट घडवून आणण्यात आले. स्फोटानंतर विमानतळाच्या परिसरात गोळीबारही झाल्याचे वृत्त असून, अरेबिक भाषेत घोषणाही देण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटामध्ये १३ जण मृत्युमुखी पडले असून, ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विमानतळानंतर सेंट्रल ब्रुसेल्स मेट्रो स्थानकावरही आणखी एक स्फोट झाला. युरोपियन युनियनच्या प्रशासकीय कार्यालयापासून जवळच असलेले हे स्थानक स्फोटांनी हादरले. प्राथमिक तपासामध्ये हा दहशतवादी हल्ला असल्याचे पुढे आले आहे. या स्फोटांनंतर विमानतळाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, विमानतळावरील विमानांची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. विमानतळावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते आहे. विमानतळावर काही जिवंत बॉम्ब सापडल्याचेही स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
पॅरिसमध्ये गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका संशयित आरोपीला चार दिवसांपूर्वी बेल्जियमच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हे स्फोट झाल्यामुळे सुरक्षायंत्रणा त्या दिशेने तपास करीत आहेत. बेल्जियममधील पोलीस आणि लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनाही आवश्यक असल्यासच घरातून बाहेर पडण्याची सूचना करण्यात आली आहे.
विमानतळाच्या डिपार्चर हॉलमधून अनेक प्रवासी बाहेरच्या दिशेने पळत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर दिसत आहेत. स्फोटामुळे डिपार्चर हॉलमधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचेही या छायाचित्रांमधून पाहायला मिळते. स्फोटांमध्ये हॉलच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या स्फोटांनंतर संपूर्ण बेल्जियममधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.