पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी वाघा बॉर्डरवर होणारा बीटिंग रिट्रिट सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एक दिवसासाठीच बीटिंग रिट्रिट रद्द करण्यात येणार असल्याचे सीमा सुरक्षा दलाने स्पष्ट केले. अमृतसरपासून जवळ असलेल्या वाघा बॉर्डरवर दररोज संध्याकाळी ध्वजावतरणावेळी बीटिंग रिट्रिट सोहळा होतो. हा कार्यक्रम बघण्यासाठी हजारो नागरिक वाघा बॉर्डरवर जमतात. मात्र, आज एका दिवसासाठी हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स केल्याची माहिती गुरूवारी लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) रणबीर सिंग यांच्याकडून देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असून, त्यांचे गंभीर नुकसान झाल्याची माहिती भारतीय लष्कराचे रणबीर सिंग यांनी दिली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा ते आठ दहशतवादी तळांवर भारतीय कमांडोंकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. रात्री १२. ३० ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. नियंत्रण रेषे पलीकडे सुमारे एक ते तीन किलोमीटरच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे.