जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ या पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना जखमी झालेले जवान गुरनाम सिंग यांचा जखमी अवस्थेत उपचार घेत असताना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी करण्यात येणार असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सव्वीस वर्षे वयाच्या गुरनाम सिंग यांनी शुक्रवारी सीमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या स्नायपर हल्ल्याचा प्रतिकार केला होता व त्यात ते जखमी झाले. काल रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सीमा सुरक्षा दलाच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले, की शौर्य पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली जाईल. तो पुरस्कारही त्यांच्या कर्तृत्वासाठी पुरेसा नाही, पण आम्ही शौर्य पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करणार आहोत. शांतता काळातील मोहिमांत धारातीर्थी पडलेल्या जवानांना अशोकचक्र हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. पुष्पचक्र वाहून गुरनाम सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना कुमार यांनी सांगितले, की सशस्त्र दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, पण दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी गुरनाम यांना लक्ष्य केले. गुरनाम यांच्या बलिदानाचा सीमा सुरक्षा दल व देशालाही अभिमान आहे. गुरनाम सिंग यांच्यावर उद्या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.