सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अनेकदा डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करताना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो व ते चिडचिडे बनतात. यावर मात करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकरिता योगाचे वर्ग सुरू करण्यात येणार असून त्यात ताण व्यवस्थापनाचाही समावेश आहे. सीमा सुरक्षा दलात स्त्री व पुरुष काम करीत असतात.
तीस दिवसांच्या योग कार्यशाळेसाठी ब्रह्मा कुमारीज या सामाजिक संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. सीमावर्ती भागात ही कार्यशाळा घेतली जाणार आहे.
झोपेच्या समस्येमुळे जवानांना खूप त्रास होत असतो व काही वेळा त्यांना नैराश्य येते व ते टोकाला जाते. या प्रश्नांचा विचार करता योग व ताण व्यवस्थापनाचा उपयोग होईल, असे मत सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख डी. के. पाठक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, या जवानांसाठी समुपदेशनही केले जाते. देशभरात योगाच्या या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मू-काश्मीरच्या बर्फाळ भागात, राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटात व पश्चिम बंगालमध्ये काम करावे लागते त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.