सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या घुसखोरीचा डाव उधळला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला. त्यांच्याकडे पाकिस्तानी सिम कार्ड आणि पाकिस्तानच्या चलनातील नोटा सापडल्या आहेत.

 

अमृतसरजवळील अजनाला सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मध्यरात्री पाकिस्तानने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेवर तैनात बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र घुसखोरांनी गोळीबार केला. त्याला बीएसएफच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. जवानांनी पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. त्यांच्याजवळील एक एके-४७ रायफल, एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी पाकिस्तानी सिम कार्ड, चार किलो हेरॉईन आणि २० हजार रुपये मूल्याच्या पाकिस्तानी नोटा सापडल्या आहेत.

बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करताना रोखले. त्यावेळी घुसखोरांनी बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन घुसखोर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यांनी दिली.