लॅण्डलाइन दूरध्वनीचा व्यवसाय पूर्वीसारखा भरभराटीला आणण्याच्या उद्देशाने सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) रात्रीच्या वेळी अमर्यादित मोफत कॉल्सची (अनलिमिटेड फ्री कॉलिंग) सुविधा जाहीर केली आहे.
येत्या १ मेपासून लागू होणाऱ्या या योजनेत ग्राहकाला मोबाइलसह कुठल्याही सेवेला रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत देशभरात कुठेही नि:शुल्क कॉल करता येईल. सर्व प्रकारच्या कनेक् शन्सचा यात अंतर्भाव राहील, असे बीएसएनएलने एका निवेदनात सांगितले.
आम्ही आमच्या लॅण्डलाइन व्यवसायाचे आधुनिकीकरण करीत असून तिचे पुनरुज्जीवन करू इच्छितो. लॅण्डलाइन वाहतुकीला आधार देण्यासाठी आम्ही कॉपर केबल लाइन्स टाकल्या असून ग्राहकांची मागणी भागवण्यासाठी लाखो उपकरणेही मिळवली आहेत, असे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. ही योजना संपण्याची कुठलीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नसून तिचा आम्ही सहा महिन्यांनी फेरआढावा घेऊ, असे ते म्हणाले.देशातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील लॅण्डलाइनचे साधारण प्लॅन, लॅण्डलाइन स्पेशल व लॅण्डलाइन-ब्रॉडबॅण्ड कॉम्बो प्लॅन हे या पॅकेजचा भाग राहतील. ताज्या आकडेवारीनुसार लॅण्डलाइन व्यवसायात वरचष्मा असलेल्या बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त घट झाली, तर एअरटेलच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. मात्र १,६२,५५६ लॅण्डलाइन ग्राहक गमावूनही कंपनीचा या बाजारपेठेत सध्या ६२.२६ टक्के इतका वाटा आहे.