बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याविरुद्ध असभ्य वक्तव्य करणाऱ्या दयाशंकर सिंह यांची जीभ कापून आणणाऱ्याला ५० लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पक्षाच्या चंदीगढमधील नेत्या जन्नत जहाँ यांनी केली आहे. जन्नत जहाँ यांच्या या घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले दयाशंकर सिंह हे गुरुवारी सकाळपासून फरार आहेत. पोलिसांनी बलिया या त्यांच्या गावी जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते सापडलेले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या भावाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येते आहे.
मायावती यांची तुलना वारांगनेशी करण्याच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळाले. लखनऊमध्ये या वक्तव्याच्या विरोधात बसपचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या निमित्ताने बसपचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. असभ्य वक्तव्य करणारे भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बसप कार्यकर्त्यांनी दहन केले. बसपचे राज्यातील आमदार, खासदार आणि नेते या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांची बुधवारी पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणावरून बुधवारी राज्यसभेमध्ये गदारोळ उडाला होता. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या तिकीट वाटप पद्धतीवर दयाशंकर सिंह यांनी टीका केली होती. त्याचवेळी मायावती यांची तुलना त्यांनी वारांगनेशी केली होती.
उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना दयाशंकर सिंह म्हणाले, मायावती यांनी काशीराम यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. ज्या पद्धतीने त्या पैसे घेऊन उत्तर प्रदेशमध्ये तिकीटे वाटत आहेत, तसे तर एखादी वारांगनाही वागली नसती. जर सकाळी कोणी त्यांना तिकीटासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिली तर त्या त्याला तिकीट देतात. पण संध्याकाळी कोणी त्याच तिकीटासाठी तीन कोटी देऊ केले तर त्या सकाळच्या व्यक्तीचे तिकीट रद्द करतात आणि संध्याकाळी आलेल्या व्यक्तीला तिकीट देतात. एखादी वारांगनाही आपल्या ग्राहकांप्रती यापेक्षा जास्त प्रामाणिक असते, असे विधान दयाशंकर सिंह यांनी केले.