पॅरिसमधील साप्ताहिक ‘शार्ली एब्दो’वर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने या हल्ल्याचे समर्थन करणारे खळबळजनक वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशमधील माजी मंत्री आणि बसप नेते हाजी याकूब कुरेशी यांनी या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱयांना ५१ कोटी रुपयांचे बक्षिस द्यायलाही तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘शार्ली एब्दो’मधील पत्रकारांची आणि व्यंगचित्रकारांची जी गत झाली, तशीच प्रेषित मोहम्मदाबद्दल अवमानजनक बोलणाऱयांची होईल, असे सांगून कुरेशी म्हणाले, प्रेषित मोहम्मदाबद्दल अवमानजनक बोलणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची काहीच गरज नाही. ते स्वतःहून मृत्यूला निमंत्रण देत आहेत.
प्रेषित मोहम्मदाचे व्यंगचित्र रेखाटणाऱया व्यंगचित्रकाराची हत्या करणाऱयाला ५१ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असे कुरेशी यांनी २००६ मध्येच जाहीर केले होते. बुधवारी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी जाहीर केलेले बक्षिस दोन्ही हल्लेखोरांना द्यायला तयार असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.