राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दलित मुद्यावर भाजपला घेरण्याचे नियोजन केले आहे. त्या दर महिन्याच्या १८ तारखेला मोर्चा काढणार आहेत. या अभियानाची सुरूवात दि. १८ सप्टेंबरपासून होणार असून १८ ऑक्टोबरपर्यंत हे मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. रविवारी दिल्लीत पक्षाच्या सर्व पदाधिकारी, समन्वय, आमदार आणि राज्यसभा खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मायावती सहारनपूर दंगल आणि दलितांवरील अन्यायाचा मुद्दा मोर्चामधून उठवणार आहेत. दलितांचा आवाज मजबूत करण्यासाठी आपण राज्यसभेचा राजीनामा दिल्याचे त्या लोकांना सांगणार आहेत. जाणूनबुजून मला राज्यसभेत सहारनपूर दंग्यांबाबत बोलण्यास दिलेले नाही माझा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी घोषणाबाजी केली. अशावेळी राजीनामा देऊन लोकांमध्ये जाऊन आवाज उठवणे योग्य हेच मला योग्य वाटले, असे मायावती म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या, आमचा पक्ष लोकांना मोठ्या प्रमाणात संघटित करून भाजप आणि एनडीएनला सत्तेबाहेर करून जातीयवाद आणि हुकूमशाहीपासून जनतेला मुक्ती मिळवून देईल. सुरूवातीला आम्ही १८ ऑगस्टपासून हे अभियान सुरू करण्याची तयारी केली होती. पण पावसाळा लक्षात ठेऊन १८ सप्टेंबरपासून हे अभियान सुरू केले जाईल. १८ तारखेलाच सहारनपूर दंगलीचा मुद्दा उठवला आणि त्याचदिवशी राज्यसभेचा राजीनामा दिला. त्यामुळे १८ तारखेलाच हे अभियान करण्यात येणार असल्याचे सांगत १८ तारीख ठरवण्यामागचे कारण सांगितले.

या अभियानांतर्गत पहिला मोर्चा सहारनपूर-मेरठ मंडलमध्ये निश्चित करण्यात आली आहे. १८ तारीखला बलिदान दिवस म्हणून घेऊन जाण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना केल्या आहेत.