उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी बिहारमधील राजकीय उलथापालथीवरुन टीकास्त्र सोडले. नितीशकुमार आणि भाजपची युती म्हणजे बिहारमधील जनतेचा विश्वासघात असल्याची टीका त्यांनी केली.

बिहारमध्ये गेल्या २४ तासांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी घडामोडींवरुन भाजप आणि नितीशकुमारांवर टीकास्त्र सोडले. ‘बिहारमधील जनतेने मोदी लाटेविरोधात मतदान केले होते आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना एकहाती सत्ता दिली होती. पाच वर्षांसाठी जनतेने हा कौल दिला होता’ याकडे मायावतींनी लक्ष वेधले. बिहारमधील गेल्या २४ तासांमधील राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चांगले लक्षण नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. सत्तेची भूक असलेल्या भाजपकडून राजकीय व्यवस्थेचा गैरवापर केला जात असून लोकशाहीसाठी हे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

मणिपूर, गोवा आणि आता बिहारमधील घटनांनी मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे भविष्य धोक्यात असल्याचे सिद्ध झाले अशी टीकाही त्यांनी केली. स्वतःच्या चुका आणि अपयशाकडून लक्ष वळवण्यासाठी मोदी सरकार विरोधकांना भ्रष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केली. देशभरातील जनतेने मोदी सरकारविरोधात पुढे यावे आणि लोकशाहीचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, बुधवारी नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नितीशकुमारांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केल्याने भाजप जदयूला पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले. अपेक्षेप्रमाणे रात्री भाजपच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. गुरुवारी नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळाही पार पडला.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. ‘ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे’, असे ट्विट करत त्यांनी नितीशकुमारांना खोचक टोला लगावला होता. काँग्रेसनेही नितीशकुमार आणि भाजप हे दोन्ही पक्ष संधीसाधू असून नितीशकुमार यांना फक्त सत्तेची भूक असल्याची विखारी टीका काँग्रेसने केली आहे.