काश्मीरच्या बडगाव जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मात्र, यावेळी स्थानिकांकडून भारतीय जवानांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक जण ठार तर चारजण जखमी झाले आहेत. येथील चादुरा परिसरात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर मंगळवारी पहाटे सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला आणि संपूर्ण परिसर खाली केला. सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. अजूनपर्यंत याठिकाणी चकमक सुरू आहे.

भारतीय सैन्याची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना मोठा जमाव दगडफेक करत त्यांच्या दिशेने चालत आला. यावेळी जमावाने जवानांवर मोठ्याप्रमाणावर दगडफेक केली. यावेळी सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात एकाच्या मानेत गोळी लागली. या व्यक्तीला उपचारांसाठी तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याशिवाय, अन्य चारजण सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्स आणि अश्रूधूराच्या माऱ्यात जखमी झाले.