केंद्रीय अर्थसंकल्प येत्या २९ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये सादर करण्यात येईल, तर रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला मांडण्यात येईल, असे संसदीय व्यवहार मंत्रिगटाच्या बैठकीत गुरुवारी निश्चित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दरवर्षी दोन सत्रात होणाऱ्या या अधिवेशनाचे पहिले सत्र १६ मार्चला संपेल आणि त्यानंतर २५ एप्रिल ते १३ मे या काळात पुन्हा दुसरे सत्र होईल. नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जातो. त्याप्रमाणे यंदाही २९ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लोकसभेत सादर करतील. २६ फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल, संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली.
यंदा एप्रिलमध्ये पश्चिम बंगालसह दक्षिणेतील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून, परंपरेप्रमाणेच हे अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. संसदीय व्यवहार मंत्रिगटाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.