राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून म्हशीच्या चोरीचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. चोरीच्या म्हशीला घेऊन चोर चंबळ नदीतून मध्य प्रदेशात जात होते. चोरांना तर नदी पार करता आली नाही, मात्र म्हैस चोरांचा मोबाईल, कपडे, पाकीट, आणि चप्पल इत्यादी सामान घेऊन मध्य प्रदेशातील अंबा माता पोलीस ठाण्यात पोहोचली. चोरांचे पुढे काय झाले हे अद्याप समजलेले नाही. अतरोली गावात म्हशीची चोरी करून दोघा जणांनी चंबळच्या नदीतून मध्य प्रदेशात जाण्याची योजना आखली होती. आपले मोबाईल, पाकीट, कपडे आणि चप्पल इत्यादी सामान सुरक्षित राहण्यासाठी प्लास्टिकच्या थैलीत टाकून ती पिशवी म्हशीच्या शिंगाला अडकवली होती, अशी माहिती राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील ढिहौली पोलीसस्थानकाचे प्रमुख शिवशंकर त्यागी यांनी दिली.
दोन्ही चोरांनी म्हशीची शेपूट पकडून नदीत काही अंतर पार केले. परंतु पुढील प्रवासात एकटीच असलेली म्हैस अंबा पोलीस स्थानकापाशी पोहोचली, जिथे गावकऱ्यांनी या म्हशीला पाहिले आणि पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी पिशवीतील मोबाईल आणि अन्य सामानाची पडताळणी केली. ग्रामस्थ आणि मध्य प्रदेश पोलिसांकडून सूचना प्राप्त होताच राजस्थान पोलिसांनी मध्य प्रदेशातील कुठाला गावात जाऊन म्हशीला ताब्यात घेतल्याचे त्यागींनी सांगितले. पिशवीतील सामान अंबा माता पोलीस स्थानकाचे प्रमुख ए. के. खनेजा यांना सपुर्द करून चोरीला गेलेल्या म्हशीला परत आणण्यात आले.
म्हशीच्या मालकाने आपली म्हैस चोरीला गेल्याची तक्रार २३ सप्टेंबर रोजी ढिहौली पोलीस स्थानकात नोंदवली होती. पोलिसांनी सध्या म्हशीला तिच्या मालकाकडे सुपूर्द केले असून, म्हशीची चोरी करणाऱ्या चोरांचा तपास सुरु आहे. चोर चंबळच्या नदीत वाहून गेल अथवा त्यांचे काय झाले याबाबत अद्याप समजलेले नाही.