केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पाळत ठेवणारे उपकरण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या वृत्ताचा गडकरींनी इन्कार केला असून हे वृत्त कपोलकल्पित असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने यावरून केंद्र सरकारवर टीका करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
१३ तीन मूर्ती मार्गावरील निवासस्थानी शयनकक्षात असे उपकरण आढळल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले. मात्र ते चुकीचे असल्याचे गडकरींनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी पाश्चिमात्य संस्था वापरतात त्या पद्धतीचे उच्च दर्जाचे उपकरण आढळल्याचे सांगितले जात होते. ही घटना पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मंत्र्यांचा परस्परांवर विश्वास नाही हेच उघड होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हे जर खरे असेल तर गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणी जनतेपुढे सत्य आले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ते कशासाठी आणि कोण करत होते हे पुढे आले पाहिजे, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी जर चौकशीचे आदेश देण्यात आले तर संसदेत आपली बाजू स्पष्ट करावी, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी सांगत, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
उपकरण प्रकरणाची चौकशी करा
गडकरी यांच्या निवासस्थानी उच्च दर्जाचे उपकरण सापडल्याने या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. केंद्र सरकारने संसदेत या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी सांगितले. ‘‘एखाद्या मंत्र्याच्या निवासस्थानी जर अशा प्रकारचे उपकरण सापडत असेल, तर ते दुर्दैव आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे ते म्हणाले.