न्यूयॉर्क शहरातील ईस्ट हार्लेम परिसरात एका इमारतीमध्ये स्फोट होऊन ती कोसळल्याचे वृत्त हाती आले आहे. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आले असले तरी सुदैवाने अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला न्यूयॉर्कच्या ईस्ट हार्लेम परिसरातील एका इमारतीमध्ये स्फोट होऊन ती कोसळल्याची खबर मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. इमारत कोसळण्यापूर्वी स्फोटांचे आवाज झाल्याचे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर आसमंतात पसरल्याचेही दिसत होते. स्फोटांच्या तीव्रतेमुळे शेजारच्या इमारतींच्या काचाही फुटल्याचे सांगण्यात आले.
सदर घटनेची खबर मिळताच अग्निशामक दलाचे २० बंब घटनास्थळी रवाना झाले, तर जखमींसाठी रस्त्यावरील लोक धावून गेले. खबरदारीचे उपाय म्हणून मेट्रो सेवा खंडित करण्यात आली आहे. पार्क अ‍ॅव्हेन्यू आणि ११६ रस्त्यावरील मेट्रोच्या मार्गावर दगडमाती पडल्याचे दिसत होते.
सदर इमारतीचा वापर व्यापारी आणि निवासासाठी केला जात होता आणि त्या इमारतीला पुरवठा करणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.