उत्तर प्रदेशमधील बलात्काराच्या घटनेला ‘राजकीय कट’ म्हणणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना हे प्रकरण चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी आझम खान यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे आगामी काळात आझम खान यांच्याविरूद्ध कडक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे गेल्या महिन्यात एक प्रवासी महिला आणि तिच्या १३ वर्षीय मुलीवर दरोडेखोरांकडून झालेली सामूहिक बलात्काराची घटना म्हणजे विरोधकांनी आगामी निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली खेळी असू शकते, असे वादग्रस्त विधान आझम खान यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची चित्रफित समाजमाध्यमांवर बरीच फोफावली असून त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. विरोधी पक्ष किंवा आगामी निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवू इच्छिणारे घटक या घनेमागे आहेत का आणि त्यांनी सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कृत्य केले आहे का याची चौकशी झाली पाहिजे. जर सत्तेसाठी निरपराध माणसांची कत्तल केली जाऊ शकते; गुजरात, मुझफ्फरनगर, शामली आणि कायराना यांसारख्या हिंसक घटना होऊ शकतात तर हेही होऊ शकते. हा विषय फक्त दोन महिलांच्या बलात्कारापुरता मर्यादित नाही. त्यामागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत आणि सत्य काय आहे, हे शोधून काढले पाहिजे, असे आझम यांनी या चित्रफितीत म्हटले होते. या विधानानंतर पीडीत मुलीने आझम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आझम खान यांना आई किंवा मुलगी नसेल, त्यामुळेत ते असली विधाने करत आहेत. कदाचित त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी असले उद्योग केले असावेत. म्हणूनच त्यांना या प्रकरणात राजकारण दिसत आहे, असे पीडित महिलेच्या पतीने म्हटले होते.