पारदर्शक कार्यपद्धतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या बुलंदशहराच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत त्यांच्या नकळत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तरुंगाची हवा खावी लागली आहे. फराझ असे नाव असलेल्या या तरुणाला त्याच्या कृत्याबद्दल न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
फराझ हा बुलंदशहर जिल्ह्यातील कमलापूरचा राहणारा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमात त्याने बी. चंद्रकला यांच्या नकळत स्वतःकडील मोबाईलमधील त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट चंद्रकला यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी फराझला रोखले आणि सहायकांना त्याला बाहेर घेवून जाण्यास सांगितले. नंतर फराझने बाहेर अधिकाऱ्यांसोबतही हुज्जत घातली. माझ्या मोबाईलमधून मी कुणाचाही फोटो काढेन, असे तो अधिकाऱ्यांना सांगू लागला. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.