केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या टर्मिनल उभारणीसाठी जागा देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नकार दिल्याने आता हा प्रकल्पच महाराष्ट्राबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. एमएमआरडीएने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली तर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अन्य राज्यात हलवण्याची चाचपणी केली जाईल, असे रेल्वे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)- ठाणे- विरार- अहमदाबाद असा प्रस्तावित आहे. त्यासाठी टर्मिनल उभारण्याकरिता वांद्रे- कुर्ला संकुलाच्या मैदानाची जागा देण्याची मागणी रेल्वेने राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे केली होती. मात्र एमएमआरडीएने त्याला नकार दिल्याने हा प्रकल्प धोक्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.
‘बीकेसी मैदान ही आमची मोठी संपत्ती आहे. रेल्वेकडे मुंबईत स्वत:च्या मालकीची शेकडो एकर जागा असताना आमच्याकडची जागा कशाला’ अशी एमएमआरडीएची भूमिका आहे. त्यावर ‘आमच्याकडे तशी जागा असती, तर तुमच्याकडे का मागितली असती,’ असा प्रतिप्रश्न रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. मात्र तरीही एमएमआरडीएने नकारघंटा कायम ठेवली तर हा प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात येईल, असे रेल्वेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. यासाठी रेल्वेने चाचपणी सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.  
लवकरच बैठक : सुरेश प्रभू
बुलेट ट्रेनच्या टर्मिनलसाठी जागा न देण्याचा निर्णय एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याने या निर्णयावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता, ‘या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार आहे,’ असे ते म्हणाले.