जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून मारला गेलेला हिजबुलचा कमांडर बुरहान वानी याचे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदशी जवळचे संबंध होते. तसेच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्यासाठी हाफिजकडून मदत घेत होता, अशी माहिती उघड झाली आहे. सीएनएन न्यूज १८ या वाहिनीने हाफिज आणि वानी यांच्यातील संवादाची ध्वनिफित प्रसिद्ध केली आहे.

काश्मीरमध्ये जवानांच्या गोळीबारात हिजबुलचा कमांडर बुरहान वानी मारला गेल्यानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जवळपास ४ महिने जम्मू-काश्मीरच्या काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली होती. जम्मू -काश्मीर चार महिन्यांनी पूर्वपदावर आल्यानंतर बुरहान वानीसंबंधी एक नवीन खुलासा समोर आला आहे. वानी याचे लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज याच्याशी खूपच जवळचे संबंध होते. तसेच काश्मीर खोऱ्यातील कारवायांसाठी तो हाफिजकडून सल्ले घेत होता, असे एका ध्वनिफितमधून समोर आली आहे. वानी भारतीय सुरक्षा दलांविरोधात लष्कर ए तोयबा आणि हिजबुलला एकत्र येण्याबाबत चर्चा करत असल्याचेही यात स्पष्ट झाले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानात असलेल्या हाफिज आणि वानी यांच्यातील संवाद जगासमोर आणला होता. दरम्यान, अद्याप या ध्वनिफितीसंदर्भातील सत्यतेला दुजोरा मिळालेला नाही.

वानी ‘लष्कर’चा म्होरक्या हाफिजकडून दहशतवादी कारवायांसाठी आदेश घेत होता, हे या ध्वनिफितमधून स्पष्ट झाले आहे. त्यात वानी हाफिजकडून ‘लष्कर’ला कमी प्रमाणात मिळणाऱ्या पैशांबाबत बोलत आहे. ‘लष्कर’च्या दहशतवाद्यांसाठी आणखी पैशांची मागणी हाफिजकडे करत आहे. हाफिज आणि आपले शत्रू सारखेच आहेत, असेही तो हाफिजशी बोलत आहे. त्यानंतर हाफिज या ध्वनिफितीत सर्वांसाठी ‘दुवा’ मागत आहे, असे स्पष्ट होत आहे. जर लष्करकडून अधिकची मदत मिळाली तर, काश्मीर खोऱ्यात दहशतवादातून मोठे नुकसान करू शकतो, असेही वानी त्यात बोलत आहे. दरम्यान, बुरहान वानी जुलैमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत मारला गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता.