पुलवामा जिल्ह्य़ातील त्राल येथे लष्कराच्या कारवाईत अलीकडेच मारल्या गेलेल्या दोन युवकांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जहाल हुर्रियत कॉन्फरन्सने काश्मीर खोऱ्यात शनिवारी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. बडगाम जिल्ह्य़ातील नरबाल येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावावर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक युवक ठार झाल्यानंतर परिस्थिती आणखीच चिघळली. या घटनेच्या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून तिची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे अधिकाऱ्यांना भाग पडले आहे. या गुन्ह्य़ात दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
‘बंद’ दरम्यान निषेधासाठी काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेला जमाव हिंसक झाल्यामुळे तणाव आणखीच वाढला. बडगाम जिल्ह्य़ातील नरबाल येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी राज्य पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १६ वर्षांच्या एका युवकासह तिघे जखमी झाले. सुहैल अहमद सोफी  या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले असता तो मरण पावला. हा युवक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गोळीबारात ठार झाल्याचे म्हटले होते.
या घटनेचा अतिरिक्त उपायुक्तांकरवी तपास करण्यात येणार आहे. तपासाचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा असे त्यांना सांगण्यात आले असल्याचे बडगामचे जिल्हा दंडाधिकारी मीर अल्ताफ अहमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
नरबाल येथे जमावावर गोळीबार करताना प्रमाणित प्रक्रियेचे (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) पालन करण्यात आले नाही असे पोलिसांनी कबूल केल्यामुळे या युवकाच्या मृत्यूबाबत वाद उद्भवला आहे. मात्र प्रक्रियेचे उल्लंघन नेमके कसे झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनेच्या वेळी प्रमाणित प्रक्रियेचे पालन न केल्याचे सकृद्दर्शनी दिसते. त्यामुळे या प्रकरणी खुनासह इतर आरोपांखाली मगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पोलिसांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
सुहैलला ठार मारण्यापूर्वी स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी त्याला आधी ताब्यात घेऊन प्रश्न विचारले व नंतर अगदी जवळून गोळी घालून ठार मारले, असे सुहैलचे काका तारिक अहमद सोफी यांनी पत्रकारांना सांगितले.
या युवकाच्या मृत्यूमुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंसाचार उसळला. तुफान दगडफेक करणाऱ्या निदर्शकांनी नरबाल येथे एक रिकामी पोलीस चौकी व एक पर्यटक झोपडी जाळली. हुर्रियतच्या मवाळ गटाचे नेते मीरवाईझ उमर फारुक यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना ‘प्रतिबंधक उपाय’ म्हणून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याच संघटनेच्या जहाल गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यापूर्वीच गुरुवारी रात्रीपासून नजरकैदेत आहेत. जेकेएलएफचा अध्यक्ष यसीन मलिक आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी शनिवारी नरबाल येथे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना  स्थानबद्ध करण्यात आले.
या घटनेची दखल घेऊन समांतर चौकशी करावी, अशी विनंती हुर्रियतच्या मीरवाईझ गटाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला केली आहे.  अफस्पासारख्या काळ्या कायद्यांनी नि:शस्त्र काश्मिरी लोकांना मारण्याचा परवानाच जणू भारतीय लष्कराला दिला असल्याचे कडवट उद्गार काढून मीरवाईझ फारुक यांनीही या घटनेचा निषेध केला.
दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ आपण रविवारी दुपारी दोन वाजता प्रताप पार्क येथे एक तास धरणे देणार असल्याचे नजरकैदेत असलेले गिलानी यांनी म्हटले आहे. नरबाल येथे तिसऱ्या युवकाची हत्या हे दहशतवादाचे  वाईट उदाहरण असल्याचे सांगून, या हत्येच्या निषेधार्थ रविवारी संपूर्ण बडगाम जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलिसांची कबुली
बदगाम जिल्ह्य़ातील नरबाल येथे जमावाशी झालेल्या संघर्षांच्या वेळेस गोळीबार करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रमाणित प्रक्रियांचे पालन केले नाही, अशी कबुली जम्मू- काश्मीर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
dv04dv05घटनाक्रम
*हुरियत कॉन्फरन्सचा जम्मू-काश्मीर बंद
*बडगाम जिल्ह्य़ात नरबाल येथे गोळीबारात एक ठार
*दंडाधिकारी चौकशीचे आदेश
*यासिन मलिक व स्वामी अग्निवेश यांचे काश्मिरी पंडितांना वेगळ्या वसाहती देण्याविरोधात उपोषण, दोघेही स्थानबद्ध