अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच डब्लू बुश हे तापाने आजारी असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांशी संवाद साधत असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्याने गुरुवारी दिली.
सीनियर बुश यांना सतत खोकला येत असल्यामुळे त्यांना २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असल्यामुळे बुश यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत ख्रिसमसही साजरा करता आला नाही.
बुश यांचे प्रवक्ते जिम मॅक्ग्राथ यांनी सांगितले की, ८८ वर्षांचे असलेल्या माजी अध्यक्षांचा बुधवारी अचानक ताप वाढला. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. रविवारपासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. ते केवळ फळांचा रस आणि पातळ पदार्थाचे सेवन करीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, बुश शुद्धीवर असून आजूबाजूला असणारे वैद्यकीय कर्मचारी आणि कुटुंबीयांशी ते संवाद साधत आहेत. बुश यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.