केरळचे अनिवासी भारतीय उद्योगपती बी रवि पिल्लई यांची डॉक्टर कन्या आरती हिच्या शाही लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नसोहळ्यात तब्बल ५५ कोटी रुपये खर्च झाले. राजस्थानच्या रॉयल पॅलेसच्याधर्तीवर आठ एकरात लग्नाचा वातानुकूलित मंडप उभारण्यात आला होता. हा लग्नमंडप उभारण्यासाठी जवळजवळ ७५ दिवसांचा कालावधी लागला. ‘बाहुबली’ या प्रसिद्ध चित्रपटचा सेट उभारणारे कला दिग्दर्शक साबू साइरिल यांनी हा मंडप उभारला होता. केरळमधील कोलम येथे पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात शोभना आणि मंजु वेरियारसह अन्य कलाकारांनी आपली अदाकारी सादर केली.

बेचाळीस देशातून तीस हजार पाहुण्यांनी वधु-वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यात बाहरीनच्या राजपरिवारातील सदस्य शेख खलीफा बिन दायज अल खलीफा, कतारच्या शाही परिवारातून शेख हमाद बिन खालिद, सौदी राजकुटुंबातील एसाम अब्‍दुल्‍ला, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केरळचे मुख्‍यमंत्री ओमन चंडी आणि चित्रपट अभिनेता मोहन लाल इत्यादी मान्यवरांचा समावेश होता. रवि पिल्लई हे ‘आर. पी. ग्रुप ऑफ कंपनीज’चे मालक आहेत. जवळजवळ २६ देशांमध्ये त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे. फोर्ब्स मासिकातर्फे जगातील एक हजार अब्जपतींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. केरळमधील ते सर्वांत धनाढ्य उद्योगपती आहेत. कोचीचे डॉक्टर आदित्य विष्णुसोबत रवि पिल्लई यांची डॉक्टर कन्या आरतीचा विवाह संपन्न झाला.