२०२२ पर्यंत देशातील दहशतवाद आणि नक्षलवादाचा अंत होणार अशी घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. लखनऊमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते, २०२२ पर्यंत काश्मीर प्रश्न सुटेल, दहशतवादी कारवाया, दहशतवाद, दहशतवादी, नक्षलवाद या सगळ्यांचा अंत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. न्यू इंडिया मुव्हमेंट अर्थात २०१७-२०२२ भारत निर्माण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते बोलत होते.

आपला देश स्वच्छ, गरीबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त, जातीच्या जोखडांतून मुक्त होईल यासाठी आपण शपथबद्ध होऊया आणि त्याच दिशेनं पावलं टाकुया असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधींनी स्वच्छतेचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्या दृष्टीनं एक मोहिम सुरू केली होती, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप दिलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर भाजप हा एकमेव पक्ष आहे जो सत्तेसाठी राजकारण करत नाही तर विकास आणि राष्ट्र निर्माणासाठी राजकारणात आहे. देशाचा विकास ही भाजपपुढची प्राथमिकता आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.