प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती म्हणून देशात संबोधित करताना त्यांच्या शेवटच्या संदेशात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याने भाजपच्या नेत्यांना धक्काच बसला. कारण प्रणव मुखर्जी यांच्या लिखित भाषणात सोनिया गांधी यांचा उल्लेख नव्हता. मात्र देशाला संबोधित करताना मुखर्जी यांनी अचानक सोनिया गांधींचा उल्लेख केला. सोनिया गांधींसोबतच प्रणव मुखर्जी यांनी अनेक माजी नेत्यांच्या नावांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख टाळला. यामुळे काँग्रेसमधील अनेकांना आश्चर्य वाटले.

‘विविधता हा भारताचा आत्मा आहे आणि सहिष्णूता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. देशातील लोकांच्या बोलण्यात आणि कृतीतही हिंसा असू नये. देश हा हिंसेपासून मुक्त असायला हवा,’ असे आवाहन प्रणव मुखर्जी यांनी देशाला संबोधित करताना केले. देशातील एकतेची भावना कायम राहायला हवी आणि विकास हा सर्वसमावेशकच असायला हवा, असेदेखील प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती म्हणून केलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हटले. ‘सर्वसमावेशकतेमुळे विकास सर्वांपर्यंत पोहोचेल. आर्थिक विकास सर्वसमावेशक असणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबातील गरिबांचे सशक्तीकरण गरजेचे असून सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यत पोहोचायला हवा,’ असे प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या अखेरच्या संदेशादरम्यान म्हटले.

‘राष्ट्रपती म्हणून काम करताना मला विविध अनुभव आले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात मी अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. माझ्या याच अनुभवांची देवाण-घेवाण देशातील लोकांसोबत करावीशी वाटते. विविधता आणि सहिष्णूता हा भारताचा आत्मा आहे. भारत केवळ भौगोलिक सत्ता नसून यात विचार, बौद्धिकता, औद्योगिक कौशल्य यांचा इतिहासाचा समावेश आहे. यामुळेच देशातील विविधता अद्याप कायम आहे. सहिष्णूतेमध्येच भारताचे सामर्थ्य दडलेले आहे,’ असे मुखर्जी यांनी त्यांच्या अखेरच्या संदेशात म्हटले.