लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३३ जागांसाठी १० राज्यांत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानाची मोजणी मंगळवारी होणार आहे. या निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बडोदा (गुजरात), मैनपुरी (उत्तर प्रदेश) आणि मेडक (तेलंगण) या लोकसभेच्या तीन जागा असून उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या ११, गुजरातमधील नऊ, राजस्थानमधील चार, पश्चिम बंगालमधील दोन, ईशान्येकडील राज्यांमधील पाच आणि छत्तीसगड व आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एक अशा ३३ जागांचे निकाल मंगळवारी लागणार आहेत.
विधानसभेच्या ३३ जागांपैकी २४ जागा भाजपच्या आहेत, तर अपना दल आणि तेलुगू देशम पार्टीची प्रत्येकी एक जागा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी जास्तीत जास्त जागा पटकावल्याने विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आपल्या १० जागा तरी पटकावणार का, याकडे लक्ष लागले आहे.
बिहारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राजद, जद(यू) आणि काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. त्यामुळे उद्याच्या निकालांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भाजप जय्यत तयारी करीत असल्याने मंगळवारी लागणारे निकालही भाजपसाठी महत्त्वाचे आहेत.