उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत, जातीयदृष्टय़ा संवेदनक्षम असलेली, मुझफ्फरनगर मतदारसंघाची जागा भाजपने पटकावली आहे. सत्तारूढ सपाला तन पैकी दोन जागांवर पराभव पत्करावा लागला असून कर्नाटकमध्ये सत्तारूढ काँग्रेसला दोन जागांवर पराभव पत्करावा लागला आहे.

बिहारमध्ये तीन महिन्यांपूर्वी बहुमताने सत्तेवर आलेल्या आघाडीला भाजप आणि घटक पक्ष असलेल्या आरएलएसपीने हरलाखी मतदारसंघात धूळ चारली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगण आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाने विजय मिळविला आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून तेथे मुझफ्फरनगर आणि देवबंद मतदारसंघात सत्तारूढ सपाला पराभव पत्करावा लागल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. केवळ बिकापूरची जागा सपाने पटकावली आहे.

कर्नाटकमध्ये विरोधी पक्ष भाजपने दोन जागा पटकावल्या असून देवदुर्ग आणि बिदर या जागा एकमेकांकडून हिसकावून घेतल्या आहेत.