लोकसभा निवडणुकीनंतर चारच महिन्यांनी झालेल्या राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून भाजपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून आले. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३३ जागांसाठी १० राज्यांत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या मोजणीला मंगळवारी सकाळी सुरूवात झाल्यानंतर प्रारंभीच्या काही तासांत गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच हे चित्र बऱ्याच अंशी पालटलेले पहायला मिळाले.
राजस्थानमधील निकाल हे भाजपसाठी धक्कादायक ठरले असून, येथील चार जागांपैकी फक्त एका जागेवरच भाजपला विजय मिळवता आला आहे. उर्वरित तीन जागांवर काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे. या विजयानंतर राजस्थानमधील हे यश पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिली. तर दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत भव्य यश मिळवून देणाऱ्या उत्तर प्रदेशातही भाजपचा प्रभाव ओसरल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवत समाजवादी पक्षाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. या ठिकाणी भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या आहेत. या विजयानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातील जनतेने सांप्रदायिक शक्तींचा पराभव केल्याची प्रतिक्रिया दिली.   
गुजरातमध्येदेखील भाजपला निराशाजनक निकालांना सामोरे जावे लागले. या ठिकाणी पोटनिवडणूक झालेल्या, सर्वच्या सर्व नऊ जागा पूर्वी भाजपच्या ताब्यात होत्या. मात्र, आज आलेल्या निकालांवरून काँग्रेसने यापैकी तीन जागा हिसकावून घेतल्यामुळे भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या दृष्टीने घडलेली आशादायक गोष्ट म्हणजे, दक्षिण बसीरहाट येथील जागेवर विजय मिळवत भाजपने पश्चिम बंगाल विधानसभेत आपले खाते उघडले आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर या पोटनिवडणुकांचे निकाल अत्यंत महत्वपूर्ण मानले जात होते. त्यामुळे पुढील महिन्यात महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांत होत असलेल्या निकालांमध्येही हाच कल कायम राहणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.