अमरिंदर सिंग यांच्याकडे पंजाब काँग्रेसची धुरा
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने, पक्षाचा सारा कारभार अजून तरी राहुल यांच्याच कलाने चालत नाही, हा संदेश गेला आहे. तसेच गांधी घराण्यातील नेत्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लगेचच महत्त्वाच्या पदावर संधी देण्याचीही ही दुर्मीळच घटना मानली जात आहे.
राहुल गांधी यांनी नियुक्त केलेल्या पंजाब, केरळ, हरियाणा, छत्तीसगड या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी तर बंडाचे निशाण उभारले होते. वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल यांना अनुभव नाही, असे मत मांडले होते. काँग्रेसमध्ये गांधी घराण्यातील कोणालाही आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थारा दिला जात नाही. दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल टीकाटिप्पणी करणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्यावर मात्र महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अर्थात, अंबिका सोनी यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करून अमरिंदर सिंग यांच्या डोक्यावर आणून बसविले आहे.

राज्य जिंकण्यासाठी तडजोड?
काँग्रेसमध्ये सध्या सोनियानिष्ठ किंवा समर्थक व राहुल समर्थकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. अमिरदर सिंग यांची नियुक्ती हा त्याचाच परिपाक असल्याचे पक्षात बोलले जाते. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूकजिंकण्याकरिता अमरिंदर सिंग यांच्याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग हे दुखावणार नाहीत याची खबरदारी घेतली. सोनिया यांच्या सूचनेवरूनच राहुल आणि अमरिंदर सिंग यांची मध्यंतरी भेटही झाली होती. पंजाबमध्ये काँग्रेसला गरज असल्यानेच अमरिंदर सिंग यांच्याकडे पुन्हा नेतृत्व सोपविण्यात आले.