प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे प्राप्तिकर खाते हॅक करणाऱ्या २१ वर्षीय सीए विद्यार्थिनीची चौकशी करण्यात येईल, असे भारतीय सनदी लेखापाल संस्थेने (आयसीएआय) म्हटले आहे.
आयसीएआयचे अध्यक्ष सुबोध कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, हैदराबाद येथील ही विद्यार्थिनी सीएची आर्टिकलशिप करीत असून तिला अकाउंट हॅक  केल्याप्रकरणी नोटीस दिली जाईल. हे प्रकरण संबंधित विभागाकडे सोपवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.ही विद्यार्थिनी मनोज डागा अँड कंपनी या सीए फर्ममध्ये आर्टिकलशिप करीत होती, त्या फर्मवर कारवाई करणार का, असे विचारले असता अगरवाल म्हणाले की, आताच काही सांगता येणार नाही. प्रथम त्या विद्यार्थिनीची चौकशी केली जाईल व नंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल.
या विद्यार्थिनीने मनोज डागा अँड कंपनी या सीए फर्ममध्ये आर्टिकलशिप करीत असताना उद्योगपती अनिल अंबानी यांचे प्राप्तिकर विवरणपत्र हॅक केले व त्यांच्या उत्पन्नाची तसेच अदा केलेल्या कराची माहिती सविस्तर घेतली.