देशभरातील शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचा विस्तार व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून नवे धोरण आखण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली.

मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा दर्जा ठरवणे तसेच उपकरणांच्या खरेदी यंत्रणा विकसीत व्हाव्यात यासाठी या धोरणामध्ये प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पांसाठी उभा करण्यात येणारा निधी आणि वित्तपुरवठा याबाबतही विचार या नव्या धोरणात करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सध्या देशातील दिल्ली, बंगळूरू, कोलकाता, चेन्नई, कोची, मुंबई, जयपूर आणि गुरुग्राम या आठ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सुरु आहेत. या सर्वांच्या एकत्रीत रेल्वे ट्रॅक जाळ्याची लांबी ही केवळ ३५० किमीपेक्षा अधिक आहे. तर हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, पुणे आणि लखनऊ या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे.