केंद्र सरकारने बांगलादेश समवेतच्या हस्तांतरण कराराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोमवारपासून ढाका दौऱ्यावर जाणार असून त्या वेळी या प्रस्तावित करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.बांगलादेश सरकारने हस्तांतरण कराराच्या मसुद्यात काही किरकोळ सुधारणा सुचविल्यानंतर या कराराला केंद्राने मान्यता दिली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या करारामुळे उल्फाचे सरचिटणीस अनुप चेतिया यांचे बांगलादेशातून हस्तांतरण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे अनेक घुसखोर बांगलादेशमध्ये आश्रयाला असून त्यांना परत आणण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.त्याचप्रमाणे भारतीय तुरुंगात असलेल्या बागंलादेशी कैद्यांना मायदेशी पाठविण्याचा मार्गही त्यामुळे मोकळा झाला आहे.