तेलंगणविषयी सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
ऑक्सिजनशिवाय वातावरण कसे असेल? त्याचप्रमाणे शिक्षकांशिवाय शिक्षणाची कल्पना करणेच अशक्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तेलंगणमध्ये शिक्षकांच्या कमी होणाऱ्या संख्येबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिक्षकांशिवाय शिक्षण मृत ठरेल असे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने सर्वाना चांगले प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी आशावादी असल्याचे म्हटले आहे. शिक्षकांशिवाय शिक्षण ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचे मतही न्या. दीपक मिश्रा आणि पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. तेलंगण राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातील काही शाळा शिक्षकांशिवाय शाळेचे कामकाज करत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
याबाबत सुनावणी वेळी न्यायालयाने वरील मत व्यक्त केले. राज्यातील सर्व शिक्षक शहरी आणि प्रगत भागातच नेमणूक केली जावी यासाठी प्रयत्न करत असल्याने ग्रामीण भागात शिक्षकांविना शाळा चालवल्या जात असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एखाद्या शिक्षकाची बदली करण्यात आल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याने त्याच्या जागी पर्यायी व्यवस्था म्हणून नवोदित शिक्षकाची नेमणूक करावी अशा सूचना देण्यात आल्याचे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या नवोदित शिक्षकांच्या नेमणुकीवरही आक्षेप घेतला आहे.