एप्रिल महिना आला की लोकांना सुटीसाठी गावाला जाण्याचे वेध लागतात, काहीवेळा नियोजनात गफलत झाल्याने रेल्वेची तिकिटे रद्द करण्याची वेळ येते पण त्यासाठी मोठे सोपस्कार पार पाडावे लागतात. पण आता एका फोनवर तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करता येणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात ही सुविधा सुरू होत आहे. फोनवर १३९ क्रमांक फिरवून तुम्ही तेथे तिकिटाचा तपशील देणे त्यासाठी आवश्यक आहे, त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड मिळतो,तो विसरता कामा नये कारण तो एकदाच दिला जातो. प्रवाशाने त्याच दिवशी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन पासवर्ड सांगून परताव्याचे पैसे घेणे आवश्यक आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परतावा नियमात बदल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी जाणे अवघड झाले होते, कारण पक्की तिकिटे ठराविक वेळेतच रद्द करणे अपेक्षित होते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया पार न पाडता आल्याने लोकांचे पैसे बुडत होते.शिवाय तिकीट रद्द करण्याचे शुल्कही मध्यस्थांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी दुप्पट केले होते, त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता १३९ क्रमांकाची सुविधा तिकीट रद्द करण्यासाठी दिली आहे. ही सुविधा तिकीट खिडकीवरून तिकीट घेतलेल्यांसाठी आहे. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केले असेल त्यांना संकेतस्थळावरच तिकीट रद्द करता येणार आहे.