काश्मीरच्या फुटीर नेत्यांनी नवी दिल्लीत पाकिस्तानी दूतांशी चर्चा केल्याचा स्पष्ट निषेध नोंदविण्यासाठी भारताने पाकिस्तानसमवेत परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द केल्यानंतरही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत चर्चा केली.
बसीत यांच्याशी बोलताना गिलानी यांनी भारताच्या निर्णयाचा निषेध केलाच परंतु काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचाही त्यांनी दावा केला. गिलानी यांनी बसीत यांची भेट घेतल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, याआधीही आम्ही काँग्रेसच्या राजवटीत तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालीलराश्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असल्यापासून पाकिस्तानसमवेत चर्चा करीत आहोत. त्यामुळे आताही त्यांच्यासमवेत झालेली चर्चा ही काही नवीन बाब नाही, असा दावा गिलानी यांनी केला. परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यामागे कोणतेही ठोस कारण दिसत नसताना, भारताने असा निर्णय घेणे दुर्देवी आहे, असेही गिलानी यांनी सांगितले.
दरम्यान, हुर्रियतच्या नेत्यांनी याआधीही अशी भेट घेतली असून गेली अनेक दशके हे सुरू असल्याचे अस्लम यांनी सांगितले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केली नसल्याचे स्पष्ट करून पाकिस्तान हे सार्वभौम राष्ट्र आहे, भारताचे मिंधे राष्ट्र नाही. त्यामुळे काश्मीरच्या तंटय़ात आम्ही वैधपणे दावेदार आहोत, असे त्यांनी नमूद केले. काश्मीर हा भारताचा घटक नसल्याचा पुनरुच्चार करून तो वादग्रस्त प्रदेश आहे, संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यावर अनेक ठराव संमत झाले आहेत, याकडे अस्लम यांनी लक्ष वेधले.

आम्ही मिंधे नाही-पाक
इस्लामाबाद: परराष्ट्र पातळीवरील सचिवांची चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारताने सोमवारी घेतल्यानंतर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणेच या निर्णयावर आगपाखड केली असून आम्ही काही भारताचे मिंधे नाही, असे सांगत काश्मीरच्या तंटय़ावर आम्हीही वेध दावेदार आहोत, असा दावा केला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी कोणत्याही प्रकारे भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केलेला नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी स्पष्ट केले. काश्मीर हा भारताचा घटक नाही,असाही अस्लम यांनी दावा केला.

रालोआ सरकार द्विधा स्थितीत
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान चर्चा रद्द करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेसने एनडीए सरकारवर हल्ला चढविला आहे. पाकिस्तानच्या प्रश्नावर सरकार ढिम्म आहे, पाकिस्तानबाबतच्या धोरणाबाबत सरकारची द्विधा मन:स्थिती आहे, भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा हुरियत नेते आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होणे हा प्रघात आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, चर्चा रद्द केल्याबद्दल माकपनेही जोरदार टीका केली आहे. जेव्हा पाकिस्तानचे नेते येतात तेव्हा फुटीरतावादी शक्ती त्यांची आपल्याच देशात भेट घेतात. आपल्या सरकारच्या परवानगीविना ही बाब शक्यच नाही, असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

चर्चा रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी- अमेरिका
वॉशिंग्टन: भारताने पाकिस्तानबरोबरची परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे, असे अमेरिकेने म्हटले असून दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहेअमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील उपप्रवक्तया मारी हार्फ यांनी सांगितले, की दोन्ही देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवरील नियोजित चर्चा रद्द करण्यात आली ही दुर्दैवी बाब आहे.