दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. तसेच दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिक आणि व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी वाहनांवरील लाल दिवे हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळाल्याने आमचे मनोबल उंचावले आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापुरुषांच्या जयंतीला शाळा आणि सरकारी कार्यालयाला मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला असणाऱ्या एकूण १५ सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे सरकारने सांगितले होते. सुट्टीऐवजी एक तासाचा कार्यक्रम घेण्यात येईल आणि त्यात महापुरुषांच्या विचारांची शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात यावी, तसेच त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण म्हणून जयंती साजरी केली जावी, असे आदित्यनाथ यांनी सांगितले होते. शालेय सुट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही अशी चिंता आदित्यनाथ यांनी व्यक्त केली होती. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून सुट्ट्या कमी कराव्या लागतील, असेही त्यांनी म्हटले होते. योगी आदित्यनाथ सरकारच्या पावलावर पाऊल टाकत दिल्ली सरकारही महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द करणार आहे. तसे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश सरकारने याबाबतीत चांगले पाऊल उचलले आहे. अन्य राज्यांकडून अशा गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला सदैव तयार राहायला हवे, असेही ते म्हणाले. दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिक आणि व्हीआयपी वाहनांवरील लाल दिवा संस्कृती संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय स्तरावर चांगलेच समर्थन मिळाले आहे. त्यामुळे आमचेही मनोबल उंचावले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.