आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे एक भीषण अपघात घडला असून, अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या कार अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण मृत्यूमुखी पडल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. हा अपघात झाला त्यावेळी गाडीत ६ जण प्रवास करत होते. ज्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा नदीवर पवित्र स्नान करून हे कुटुंब परतत होते. ही दुर्घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून, केवळ काही सेकंदात ही गाडी मुख्य रस्तावरून जवळजवळ १० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळताना या व्हिडिओमध्ये दिसते. ही दृश्ये विजयवाडामधील बैंज चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. मंगळवारी घडलेल्या या घटनेत पंढऱ्या रंगाची एक स्विफ्ट गाडी डिव्हायडरला आदळून अडथळे तोडून खाली पडते. यात तीन जण जागीच मृत्यूमुखी पडले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आजुबाजुचे लोक तातडीने मदतीला धावले. गाडीच्या काचा तोडून लोकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढले. जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. या चौकात गाडीचा वेग सर्वसाधारणपणे ४० च्या आसपास असतो. परंतु ही गाडी खूप वेगात होती. ज्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. श्रीकाकुलम येथे विजयवाडा पुष्कर स्नानासाठी हे कुटुंब आल्याचे सांगितले जाते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

व्हिडिओ