हैदराबाद येथे टोल नाक्यावर ट्रकच्या मागे उभ्या असलेल्या कारला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. येथील आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कार चालक गंभीर जखमी झाला असून खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सुथारीगुडा येथील टोल नाक्यावर आठ विद्यार्थ्यांना घेऊन तवेरा कार एका ट्रकच्या मागे उभी होती. त्याचवेळी मागील बाजूने भरधाव आलेल्या ट्रकने तवेराला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. कारमधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक एस. राजशेखर रेड्डी यांनी सांगितले. हे सर्व विद्यार्थी हैदराबादपासून ७५ किलोमीटर दूर असलेल्या मेडक जिल्ह्यातील सदाशिवपेठ येथून आले होते. कोम्पली येथील एका लग्न सोहळयास उपस्थित राहण्यासाठी हे सर्वजण निघाल्याचे सांगण्यात आले.