बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील एका वकिलाने थेट भगवान श्रीरामांविरुद्धच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. श्रीरामांनी कोणतेही कारण नसताना सीतामातेचा त्याग केल्याबद्दल त्यांच्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. या याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी होणार असून, त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सीतामढी जिल्ह्यातील मेजरगंजमध्ये राहणारे चंदनकुमार सिंह यांन ही याचिका न्यायालयात दाखल केली. त्यांनी याचिकेत म्हटल्याप्रमाणे, मिथिला नगरीच्या सीतामाता यांचा काहीही दोष नसताना श्रीरामांनी त्यांचा त्याग केला. हे एक प्रकारे महिलेचे शोषणच आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. एका त्रयस्थ व्यक्तीच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी सीतेला पुन्हा वनवासाला जायले भाग पाडले, असेही याचिकेमध्ये म्हटले आहे. आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, केवळ सीतामातेला न्याय मिळवून देण्यासाठी ही याचिका केली असल्याचे चंदनकुमार सिंह यांनी सांगितले.