बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याविरोधात असभ्य वक्तव्य करणारे भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांची पत्नी स्वाती सिंह यांनी मायावती आणि बसपच्या तीन नेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मायावती आणि बसपच्या नेत्यांनी आपल्याविरुद्ध असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप स्वाती सिंह यांनी केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेतील कलम १२० ब, १५३ अ, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती सिंह म्हणाल्या, बसपच्या नेत्यांनी आमच्याविरोधात बोलताना पातळी सोडली. मला व माझ्या मुलीला विनाकारण यामध्ये ओढण्यात आले. आमच्यावर हिन पातळीवरील टीका करण्यात आली. त्यामुळेच याविरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, माझे पती दयाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांना आता भाजपमधून काढून टाकण्यात आलेले आहे. तरीही मायावतींचे समाधान झालेले नाही का, त्यांना माझ्या पतीचा बळीच हवा आहे का, असा प्रश्नही स्वाती सिंह यांनी विचारला.
दोन दिवसांपूर्वी दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना वारांगनेशी केली होती. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती पक्षाची तिकीटे विकत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपाचे गंभीर पडसाद संसदेमध्ये उमटले होते. त्यानंतर भाजपने त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती.