उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यामुळे वाहतुक थांबवण्यात आल्याने एका तरुणाला आपल्या आईला हातांवर उचलून घेऊन रुग्णालयात धाव घ्यावी लागली. याचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. गोऱखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे योगी सरकारला टीकेचा सामना करावा लागल्यानंतर आता या घटनेमुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

रविवारी दुपारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी बाबा राघव दास (बीआरडी) रुग्णालयाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान एक आजारी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, रस्त्यावरील वाहतुक थांबवण्यात आल्याने रुग्णालयात पोहोचण्यात अडचण येत असल्याने सुनिल पांडे हे आपली ७० वर्षीय आई लीलावती यांना हातावर उचलून घेऊन इमर्जन्सी ट्रॉमा सेंटरकडे जाण्यासाठी रस्त्यावरून धावत होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतरच ते शांत झाले होते. याचे छायाचित्र समोर आले आहे. सुनिल यांची आई कमरेच्या दुखण्याने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना चालताच काय तर, धड बसताही येत नव्हते, अशी माहिती सुनिल यांनी दिली.

सुनिल म्हणाले, “आईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याने मी तीला उचलून घेतले आणि तडक ‘एक्स रे’ विभागाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री येत असल्याने मला लवकर यायला हवे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आईला मी माझ्या मानेजवळ करकचून पकडायला सांगितले आणि तिला उचलून घेऊन मी रस्त्यावरून धावत सुटलो”.

[jwplayer ahfK5LyD]