दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयात केंद्रीय अन्वेषण विभागाने छापा टाकल्याचे वृत्त निराधार असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्या देवप्रीत सिंग यांनी मंगळवारी दुपारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी दिल्लीतील सचिवालयातील त्यांच्या कार्यालयासह एकूण १४ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.
सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापा टाकल्याचे सांगण्यात येत असले, तरी ते वृत्त निराधार असून, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कसलीही तपासणी केलेली नाही. या संदर्भात जो अपप्रचार करण्यात येतो आहे, त्यामुळे आमच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही देवप्रीत सिंग यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावरच सीबीआयने छापे टाकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या छाप्यांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले होते. राज्यसभेमध्येही तृणमूल काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता.