तालाबिरा-२ कोळसा खाणक्षेत्राचे हिंदाल्कोला वाटप केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नुकतीच चौकशी केल्यानंतर सीबाआयने बुधवारी या वाटपासाठी सिंग यांना दोनदा पत्रे लिहिणारे उद्योजक कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष असलेले कुमारमंगलम बिर्ला हे कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील एक आरोपी असून २००५मध्ये त्यांनी पाठविलेली पत्रे व सिंग यांचा त्यामधील सहभाग, याबाबत अधिक तपासाची गरज नसल्याचे सांगत सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात १६ डिसेंबरला ‘क्लोजर रिपोर्ट’साठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने मात्र ती नाकारली होती. तसेच सिंग यांची चौकशी करण्यास फर्मावले होते.