अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरीचा आरोप झालेले तत्कालिन हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱयांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. 
त्यागी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आणि इतर कथित आरोपींवरही एफआयआर दाखल करण्यात आला. ऑगस्टा वेस्टलॅंडकडून हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासात स्पष्ट झाले होते. या व्यवहारात दलाली करणाऱयांनी त्यागी यांचे नाव घेतल्याने त्यांची गेल्या आठवड्यात सीबीआयने चौकशी केली होती. माजी केंद्रीय मंत्री संतोष बगरोदिया यांचा भाऊ सतीश बगरोदिया याचेही नाव एफआयआरमध्ये घालण्यात आले आहे.
लाचखोरीप्रकरणी आतापर्यंत १२ व्यक्तींची आणि चार कंपन्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सीबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आलीये. तपासाचा भाग म्हणून दिल्ली, गुडगाव आणि चंदिगढमधील विविध १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यागींच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले.