केरळमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

अर्नाकुलम जिल्ह्य़ात तीस वर्षे वयाच्या कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास केंद्र सरकारची तयारी आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

केरळमध्ये १६ मेच्या विधानसभा निवडणूक टप्प्याच्या प्रचारासाठी येथे आले असताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने शिफारस केली तर या प्रकरणात तातडीने सीबीआय चौकशीचे आदेश दिले जातील. या बलात्कार प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी कोल्लम येथे जाहीर सभेत दिले. सदर मुलीच्या बलात्कार प्रकरणात राज्य पोलिसांना तपासात अपयश आले असून त्यादृष्टीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला विशेष अर्थ आहे.

अर्नाकुलम जिल्ह्य़ात पेरूम्बवूर येथे २८ एप्रिलला या दलित मुलीवर तिच्या घरी बलात्कार झाला. तिच्या आईला ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली व तिची सर्व आतडी बाहेर आली होती. तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर वार करण्यात आले होते. अतिशय धक्कादायक अशा या घटनेचे पडसाद संसदेत उमटले होते व गुन्हेगारांना वचक बसेल अशी शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, गुन्हेगारांना पकडण्याच्या मागणीसाठी राज्यात निषेध आंदोलने सुरू झाली आहेत.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची टीका

दरम्यान केरळात दलित मुलीवरील बलात्काराची राज्याच्या अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे. या संस्थेच्या महिला हक्क विभागाच्या व्यवस्थापक रेखा राज यांनी सांगितले की, दलित महिलांविरोधातील हिंसाचारात पोलिसांची भूमिका निष्क्रियतेची दिसते आहे, ही अस्वस्थ करणारी बाब आहे. याआधीच्या एका प्रकरणातही पोलिसांना तपासात अपयश आले आहे.

नर्सिग शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना अटक

तिरूअनंतपुरम-  केरळमध्ये वरकला येथे तीन मे रोजी १९ वर्षे वयाच्या नर्सिग शाखेच्या विद्यार्थिनीवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यात साफीर (वय २५) सायजू(वय२१) रशीद (वय२०) सर्व राहणार, वरकला, तिरूअनंतपुरम यांचा समावेश आहे, असे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक शीफीन अहमद यांनी सांगितले. ही विद्यार्थिनी बी एस्सी नर्सिगच्या दुसऱ्या वर्षांला होती. साफीर व त्याचा मित्र सायजू यांनी इतरांसह वरकला येथील अयांती ब्रिज या भागात रिक्षामध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. त्यात सायजू हा रिक्षाचालक आहे. त्यांनी या मुलीला निर्जन ठिकाणी नेताना रिक्षातच सामूहिक बलात्कार केला, नंतर निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार सुरूच ठेवले होते. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, असे आरोपपत्र आम्ही कायदेशीर सल्ल्यानंतर दाखल करणार आहोत असे सांगून अहमद म्हणाले की, कलम ३७६(२) जी म्हणजे सामूहिक बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर मुलगी साफीर याला ओळखत होती. ती त्याचा मित्र सायजू याच्या रिक्षातून साफीरबरोबर जात असताना नंतर त्यांनी रशीद याला बोलावून घेतले व रिक्षा रेल्वे स्थानकाकडे नेली व चालू रिक्षातच तिच्यावर बलात्कार केला. अर्नाकुलम जिल्ह्य़ात पेरूम्बवूर येथे एका दलित मुलीवर बलात्कार करून तिचा क्रूरपणे खून केल्याच्या घटनेनंतर ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.