चेन्नईतील बोटहाउस निवासस्थानी ३०० हून अधिक क्षमतेच्या बीएसएनएलच्या दूरसंचार यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप असलेले माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची बुधवारी सीबीआयने चौकशी केली.
सकाळी ११ वाजता मारन सीबीआयच्या मुख्यालयात हजर झाले आणि विशेष कृती दलाने त्यांची चौकशी केली. मारन यांना सोमवारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्या दिवशी ते गैरहजर राहिले, असे सूत्रांनी सांगितले. मारन यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने ‘सन टीव्ही’च्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली होती त्यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. व्ही. गौतमन, एस. कन्नन आणि एल. एस. रवी अशी त्यांची नावे आहेत.
मारन हे दूरसंचारमंत्री असताना जमिनीखालून ३२३ निवासी जोडण्या त्यांच्या बोटहाउसला आणि ‘सन टीव्ही’ला बीएसएनएलच्या महाव्यवस्थापकांच्या नावावर जोडण्यात आल्या होत्या असा आरोप सीबीआयने केला आहे. या सामान्य दूरध्वनी जोडण्या नव्हत्या तर अत्यंत महागडय़ा आयएसडीएन जोडण्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकारच्या जोडण्या बडय़ा उद्योगसमूहांच्या विशेष गरजा म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसारख्या गरजा भागविण्यासाठी वापरण्यात येतात आणि त्यासाठी भरमसाट शुल्क आकारले जाते. मात्र सन टीव्हीला ते विनामूल्य पुरविण्यात आले, असे सीबीआयने म्हटले आहे.