सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर मंगळवारी सीबीआयने छापा टाकला. तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीने चालवलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांनी परकीय चलन नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशी अंतर्गत आज सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे.
सेटलवाड यांच्या सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा.लि. या कंपनीला अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशनकडून एसीआरए नियमांचे उल्लंघन करून ३ कोटी रूपयांची मदत देण्यात आल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर आहे. दरम्यान, सरकारने मुंबईतील जुहू येथे या आस्थापनेचे असलेले खाते यापूर्वीच गोठवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे कम्युनॅलिझम कॉम्बॅट नियतकालिकाचे सहसंपादक होते तसेच मुद्रक व प्रकाशकही होते. सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि या संस्थेच्या नावाखाली ते चालवले जात होते व त्याला परदेशी देणग्या मिळालेल्या होत्या. परकीय चलन नियंत्रण कायद्यानुसार कुठल्याही स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, प्रकाशक, मुद्रक, प्रतिनिधी, संपादक यांना परदेशी देणग्या स्वीकारता येत नाहीत.