हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि आयआरसीटीसीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००६ मध्ये रेल्वेच्या मालकीचे पूरी आणि रांची येथील हॉटेल एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. हॉटेलचा विकास करणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि चालवण्याचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले होते. या व्यवहाराच्या मोबदल्यात संबंधीत कंपनीने पाटणा येथे दोन एकरची जागा लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधीत कंपनीच्या नावावर केली होती. या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयकडून तपास सुरु होता. सीबीआयच्या पथकाने दिल्ली, पाटणा, रांची, पूरी, गुरुग्राम तसेच लालूप्रसाद यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे निवासस्थान अशा १२ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत भर पडली आहे. सुमारे एक हजार कोटींची बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली, गुरुग्राम आणि हरयाणातील रेवाडी आदी २२ ठिकाणी प्राप्तिकर खात्याने मे महिन्यात छापे टाकले होते. याशिवाय कन्या मिसा भारतीच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण आणि चारा घोटाळ्यातील सर्व खटले एकत्रित चालविण्याऐवजी स्वतंत्रपणे चालविण्याचा दणका देणारा सुप्रीम कोर्टाचा आदेश यामुळे लालूप्रसाद यादव आधीपासूनच अडचणीत आले होते.