कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील खटल्यांतील सुधारित अहवाल १६ ऑक्टोबरआधी विशेष सीबीआय न्यायाधीशांसमोर मांडण्यापूर्वी त्याचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा, असे आपण सीबीआय सांगितल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलाने गुरुवारी दिल्ली न्यायालयाला सांगितले. सीबीआय कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करणार आहे. यावरील सुधारित अहवाल सीबीआयने तयार केला आहे. यावर विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी अहवालात काही त्रुटी राहिल्याची शक्यता वर्तवल्याने सरकारी वकिलांनी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली.
ताज्या अंतिम अहवालाचा नव्याने आढावा घेण्याविषयी आपण सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना विचारले आहे. घोटाळ्यातील काही अहवाल जुनेच आहेत. त्याला आता पुरवणी अहवाल जोडला जाईल, असे सरकारी वकील आर. एस. चिमा यांनी स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान चिमा यांनी न्यायालयाला हेही सांगितले की, येत्या १६ ऑक्टोबपर्यंत सीबीआय आपला अहवाल न्यायालयाला सादर करील. याआधी सादर केलेल्या सीबीआयने जेएलडी यवतमाळ एनर्जी कंपनीला कोणत्याही प्रकारचा अवाजवी लाभ देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले होते.
लाच प्रकरणी चीनमध्ये वरिष्ठ नेत्याची हकालपट्टी
बीजिंग: गर्भश्रीमंत ग्वांगझू प्रांताच्या प्रमुखाची लाच घेतल्याच्या प्रकरणावरून चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने गुरुवारी हकालपट्टी केली. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. वान क्विंगलियांग यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि या निर्णयाला येत्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. ५० वर्षीय वान हे ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन’ या पक्षातील ‘उगवता तारा’ म्हणून मानले जात होते. त्यांच्यासारख्या नेत्याने लाच घेणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हे प्रकरण न्याय विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या सदस्यांमार्फत त्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर वान यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जैसलमेर: सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका रेल्वे कर्मचाऱ्याला पोखरण पोलिसांनी अटक केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. दिलीप दीक्षित असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून घेतले व तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागल्याने तिच्या आईवडिलांनी दिलीपच्या घरी धाव घेतली तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दिलीप हा रेल्वेच्या दूरसंचार विभागात काम करतो. पीडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीपला अटक केली.
मलेशियात बॉम्बस्फोटात एक ठार, १३ जखमी
कौलालम्पूर: कौलालम्पूर शहरातील एका नाइट क्लबबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार, तर १३ जण जखमी झाले. दोन्ही टोळ्यांमधील वादातून हे कृत्य घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेला कार जॉकी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुकीत बिन्टांग येथील ‘चेरी ब्लॉसम’ या नाइट क्लबबाहेर हा स्फोट झाला. पर्यटक आणि बाजारपेठेसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. येथे लोकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे समाजकंटकांनी हा स्फोट घडवून आणला असावा, अशी माहिती शहर गुन्हे तपास विभागाचे आयुक्त गान कोंगमेंग यांनी दिली.
जामिनासाठी जयललिता यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चार वर्षे तुरुंगवासाची झालेली शिक्षा आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी जामिनासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जयललिता या गेले १२ दिवस तुरुंगाची हवा खात असून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्याला केवळ चार वर्षांची शिक्षा झाली असून आपल्याला अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणांच्या आधारे आपल्याला तातडीने जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करून आपण याप्रकरणी कोठेही मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केलेला नाही, असाही दावा जयललिता यांनी याचिकेत केला.